महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेचा शासकीय, न्यायालयीन यासह सर्व क्षेत्रात पूर्णपणे वापर व्हावा, ही ज्ञानभाषा व्हावी हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून ‘मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था’ या नावाने सहाय्यक धर्मादाय आयुक्त, ठाणे यांचेकडे या नावाने संस्था २००० मध्ये नोंदविण्यात आली.

विविध उपक्रमांद्वारे विविध स्तरांवर मराठी भाषेचा वापर होण्यासाठी प्रयत्न करणे या प्रमुख उद्देशाने ही संस्था काम करीत आहे. तालुका व जिल्हा पातळीवरील न्यायालयांमध्ये १९९८ च्या अधिसूचनेप्रमाणे कामकाज मराठीतून पूर्णपणे व्हावे, घटनात्मक तरतूदीप्रमाणे मराठी भाषा मुंबई उच्च न्यायालयात प्राधिकृत भाषा व्हावी, महाविद्यालयीन शिक्षणात मराठी भाषा हे शिक्षणाचे एक माध्यम म्हणून विकसित व उपलब्ध करुन देण्यात यावे आणि मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी संस्था विविध प्रकारच्या उपक्रमांद्वारे करीत आहे.